मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्यन पंप्सच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्यन पंप्सच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट
‘मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ अभिप्रायासह उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे केले कौतुक*
संपादकीय
दि. ३०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनापती बापट रस्त्यावरील आर्यन हाऊस येथे कार्यरत असलेल्या आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट देऊन तेथील संशोधन व तंत्रज्ञानविषयक कामकाजाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी 'मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ अभिप्रायासह उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
या केंद्रामार्फत कंपनीच्या जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन व विकासाचे काम केले जाते. या केंद्रात विकसित करण्यात आलेले अत्याधुनिक हायड्रॉलिक पंप, विशेष उपयोगासाठीचे इंजिनचलित पंप संच, जेटिंग रिसायकलर्स तसेच आपत्कालीन सेवांसाठी आवश्यक असलेल्या ‘फर्स्ट रिस्पॉन्स वाहनां’च्या डिझाइन व संशोधन प्रक्रियेची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतली.
तत्पूर्वी कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक भव्य पंप यंत्रणा बसविण्यात आलेल्या वाहनाचीही त्यांनी पाहणी केली. या वाहनावर ‘मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ असा अभिप्राय नोंदवत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रात विकसित होणारे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्य जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
आर्यन पंप्स अँड एनवेरो सोलुशन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांनी कंपनीकडून विकसित केल्या जाणाऱ्या संशोधनाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कंपनीला आणि अभियांत्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी 'मित्रा' चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मेट्रोचे व्यवस्थापकी संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
Start the conversation!
Be the first to share your thoughts on this story.